बहुजन समाजातील लोकांसाठी बहुजन समाजाच्या अस्मितेच्या गोष्टी आणि प्रतीकं उपलब्ध असलेली एकही वेबसाईट किंवा प्रस्थापित ई-कॉमर्स कंपनी नाही. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात निखिल बोर्डे या युवकाने बोधीतत्व नावाची वेबसाईट उघडून त्याद्वारे बहुजन समाजातील कलाकृतींना आणि प्रतीकात्मक गोष्टींना विक्रीसाठी एक व्यासपीठ तयार केलं आहे.
www.bodhitatva.com या संकेतस्थळावरून गेल्या महिन्याभरात तब्बल 5 हजारांहून अधिक बहुजन समाजातील लोकांनी टी-शर्ट, पेंटिंग्स ऑर्डर केल्याचं निखिल बोराडे यांनी सांगितलं आहे. लहानपणापासूनच बहुजन महापुरुषांच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची दिनदर्शिका पाहायला मिळाली नाही. तोच विचार डोक्यात ठेवून 2 वर्षांपूर्वी निखिल बोर्डे यांनी आपली स्वतःची एक दिनदर्शिका प्रकाशित केली. या दिनदर्शिकेमध्ये त्यांनी बहुजन समाजातील महापुरुष आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या दिनदर्शिकेच्या मागच्या बाजूला छापली. त्याच्या जवळपास हजारात प्रति बाजारात आणल्या आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला.
मागच्या महिन्यात निखिल यांनी बहुजनांची कलाकृती समाजापुढे आली पाहिजे यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये पाऊल टाकत बहुजन समाजाच्या अस्मितेशी निगडीत आणि बहुजन समाजाचे प्रतीक असलेल्या वस्तू ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून बहुजन समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच त्यांनी समाजातील बहुजन कलाकृती निर्माण करणाऱ्यांना आवाहन केलं की, आमचं व्यासपीठ तुमच्यासाठी नेहमीच उघडं आहे. म्हणजे बहुजन समाजातील कलाकृती निर्माण करणाऱ्या लोकांना बोधितत्व त्यांच्या वस्तू जगभरातील बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एकप्रकारे व्यासपीठ तयार करून देत आहे.
बहुजन समाजातील तब्बल 150 हून अधिक कलाकार ज्यांची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती. अशांना बोधीतत्व व्यासपीठ तयार करून त्यांना आर्थिक आधार देण्याचाही प्रयत्न करत आहे. आजच्या तरुणाईला हव्या असलेल्या गोष्टी त्यांच्या आवडीनुसार उपलब्ध करून देऊन बहुजन समाजाचा प्रसार करण्याचा प्रयत्न असल्याचं निखील बोर्डे यांनी सांगितलं.
बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची टी-शर्ट, पेंटिंग अशा प्रकारच्या गोष्टी तरुणाईपर्यंत पोहोचवून समाजासाठी काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कुणाल गडहिरे, निखिल बोर्डे आणि ऋषिकेश सोळस हे तिघे मिळून सध्या बहुजन समाजाची अस्मिता जपणारी ही वेबसाईट पुढे नेत आहेत. तसेच भविष्यात बोधीतत्त्व हे बहुजन लोकांचं अमेझॉन असेल असा विश्वासही निखिल बोर्डे यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच येणाऱ्या काळात पुस्तक, चरित्र आणि बहुजन समाजांशी निगडित महापुरुषांच्या मुर्त्या लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Special Article by- समीर मोरे, प्रतिनिधी, पुणे , थोडक्यात मीडिया

1 टिप्पण्या
अतिशय चांगला उपक्रम नेहमीच साथ असेल काही मदत लागली तर आवश्यक कळवा.
उत्तर द्याहटवाजयभीम