अमरावती | उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील भूतगडी गावातील १९ वर्षीय मुलीवर चार नराधमांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले. या आरोपींनी क्रुरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली आहे. तसेच तिच्या मणक्याची हाड देखील मोडण्यात आले. त्यानंतर पीडितेला दिनांक २८ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. दिनांक २९ सप्टेंबर रोजी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
सदर प्रकरणावर राजकीय दबाव असल्याने, दडपण्याच्या हेतूने तेथील जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने अधिकाराचा दुरुपयोग करून, तिचे पार्थिव तिच्या कुटुंबाला न देता तिच्या घरच्यांच्या परस्पर दहन केले. पीडितेच्या कुटुंबावर प्रचंड दबाव टाकून त्यांना अपेक्षित जबाब घेण्यात आला. सदर घटनेच्या दिवसापासून त्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यास कोणालाच भेटू दिले नाही. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच यामध्ये दोषी प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना सहआरोपी करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी चांदूर रेल्वेच्यावतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री व शासनास पोहचवण्यासाठी सदर निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.रवींद्र मेंढे, व तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी मा.प्रेमचंद भाऊ अंबादे, मा.दादासाहेब घुरडे, युवानेते मा.अजय भाऊ राऊत नवनियुक्त जिल्हा युवा उपाध्यक्ष अमरावती, वंचितचे २०१९ चे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युवानेते मा.निलेश भाऊ विश्वकर्मा, पत्रकार रवी कलाने, व तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या