केंद्रातील मोदी सरकारने अचानक लादलेल्या कांदा निर्यातबंदीचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून, बुधवारी मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी केंद्राच्या त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद  पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्र सरकारला भेटणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कांद्याच्या प्रश्नावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याबद्दल मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली. पवार यांची वेळ घेऊन महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्राकडे निर्यात बंदी मागे घेण्याची आग्रही मागणी करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री दिल्लीत जातील, असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.