इंग्लंडच्या पंतप्रधानांपासून धारावीतल्या मजुरापर्यंत कोणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झालीये की हा व्हायरस गरीब-श्रीमंत, उच्चशिक्षित-अर्धशिक्षित, शहर-ग्रामीण, जात-धर्म-पंथ या आधारावर भेदभाव करत नाही. पण लिंग गुणोत्तराचं काय? कोरोना व्हायरस स्त्री-पुरुषांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो का? आणि असं असेल तर का?

स्त्रिया आणि पुरुष यांच्यातला कोरोना संदर्भातला फरक फक्त कोण आजारी पडतं आणि कोण नाही इतकाच नाहीये तर याचा परिणाम त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि आर्थिक स्थैर्यावरही होतो.

मृत्यूदरातला फरक

कोरोना व्हायरसचा जेवढा अभ्यास केला गेलाय त्यातून ठळकपणे समोर आलेली एक गोष्ट म्हणजे या व्हायरसचा संसर्ग झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांच्या मृत्यूदरातला फरक. अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुष मरण पावले आहेत, तर पश्चिम युरोपमध्ये 69 टक्के पुरुषांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी 76 टक्के पुरुष आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 73 टक्के पुरुष आहेत.