मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130 वी जयंती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदाही गर्दी न करता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं अस आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दरवर्षी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकरी जनतेची गर्दी होत असते. यंदा मात्र अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरातूनच जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चैत्यभूमी परिसरात लावण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी 10.55 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहे .


आंबेडकर जंयतीदिनी बाबासाहेब यांच्या चैत्यभूमी इथल्या स्मारकस्थळावरुन थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांचं प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे केल जाणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.